---Advertisement---
महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली असून वाहनचालक आणि घरगुती ग्राहकांच्या खर्चात वाढ होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जागतिक घडामोडींमुळे इंधन बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या होत्या. मात्र परिस्थिती स्थिर होत असताना इंधनाच्या दरात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
अशातच सीएनजीच्या दरात सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. नव्या दरांनुसार वाहनचालकांना आता सीएनजीसाठी प्रतिकिलो 95 रुपये 75 पैसे मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 8 मे रोजी सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 28 मे रोजीही दरवाढ जाहीर झाली होती. आता पुन्हा एकदा दर वाढल्याने वाहनधारकांच्या खर्चात भर पडणार आहे.
यासोबतच घरगुती वापरासाठीच्या पीएनजीच्या दरातही 85 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पीएनजीचा दर आता 51 रुपये 50 पैसे प्रति मानक घनमीटर इतका झाला आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण आणि हिंजवडी परिसरातील ग्राहकांना या दरवाढीचा थेट परिणाम जाणवणार आहे. विशेषतः सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनधारकांच्या मासिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
एकीकडे इंधन दर कमी होण्याची अपेक्षा असताना झालेल्या या वाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक वायूच्या वाढलेल्या दरांचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार असल्याचे बोलले जात आहे.









