---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई केली असून वाळूने भरलेला ट्रक आणि ट्रॅक्टर जप्त केला आहे. या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड आणि तहसीलदार गोपाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने उत्राण गुजर परिसरात ही कारवाई केली. अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाचे पथक गस्त घालत असताना वाळूने भरलेला सोळा चाकी ट्रक आणि ट्रॅक्टर आढळून आला. एरंडोलचे निवासी नायब तहसीलदार संजय घुले, मंडळ अधिकारी संजय साळुंखे, तलाठी गजानन बहुरे, रविराज पाटील, आकाश महाजन, संदीप पाटील आणि महसूल कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत ही वाहने ताब्यात घेतली आणि तहसील कार्यालयात जमा केली.
एरंडोल तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून गिरणा नदी पात्रासह विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर वाळू आणि मुरुमाचे अवैध उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. विशेषतः मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत वाळूची वाहतूक होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. उत्राण, हनमंतखेडा, कढोली, टाकरखेडा तसेच गिरणा नदी परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय पद्मालय, उमरदे आणि विखरण परिसरातून मुरुमाचीही मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात असल्याचे सांगितले जाते.
अवजड वाहनांमधून होणाऱ्या या वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान तर होतच आहे, शिवाय पर्यावरणालाही धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
तहसीलदार गोपाल पाटील यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, एरंडोल तालुक्यात वाळू, मुरुम आणि इतर गौण खनिजांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. नियम मोडणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









