धरणगावात चोरट्यांचा धुमाकूळ; स्वामी समर्थ केंद्र फोडून रोख रक्कम व चांदीचे मुकुट लंपास….!

---Advertisement---

 

धरणगाव शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट सुरू असून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील स्वामी समर्थ केंद्रात चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी रोख रक्कम, दानपेटीतील चिल्लर तसेच चांदीचे मुकुट आणि मूर्ती असा हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

१६ जूनच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी स्वामी समर्थ केंद्राला लक्ष्य केले. सकाळी सेवेकरी महेश पाटील मंदिरात आल्यानंतर त्यांना केंद्राचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. तसेच गर्भगृहातील तिजोरीही फोडण्यात आल्याचे निदर्शनास आले.

चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर देखील तोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मंदिराचा कोयंडा कटरच्या सहाय्याने कापण्यात आला होता. मंदिरातील दानपेटीत जमा झालेली रोख रक्कम, चिल्लर तसेच चांदीचे मुकुट आणि देवांच्या मूर्ती असा एकूण सुमारे ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

धरणगाव स्थानिकांच्या माहितीनुसार, मंदिराच्या दानपेटीत दरमहा मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होत असते. अधिक मासानिमित्त भाविकांची संख्या वाढल्याने यावेळी दानपेटीत नेहमीपेक्षा अधिक रक्कम असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणी राजेंद्र पुंडलिक पाटील यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील चिंतामण मोरया परिसरासह विविध भागांत अलीकडच्या काळात चोरीच्या घटना वाढल्या असून अद्याप अनेक प्रकरणांतील आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

सततच्या चोरीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष पवार आणि त्यांच्या पथकाकडून सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---