पाचोऱ्यात कट झालेल्या सर्व्हिस वायरचा शॉक लागल्याने २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पाचोरा शहरात हळहळ….!

---Advertisement---

 

पाचोरा शहरातील हिंद ऑईल मिल रोड परिसरात कट झालेल्या वीज सर्व्हिस वायरचा शॉक लागून २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेत माजी नगरसेवक दत्तात्रय जडे यांचा पुत्र लोकेश जडे याचा मृत्यू झाला असून संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

हिंद ऑईल मिल रोड परिसरातील जडे कुटुंबाच्या घराजवळील वीज खांबावरून घराला वीजपुरवठा करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी लोकेश जडे हा घराबाहेरील लोखंडी जिन्याने वरच्या मजल्यावर जात असताना कट झालेल्या सर्व्हिस वायरचा त्याच्या खांद्याला स्पर्श झाला. त्यावेळी परिसरात पाऊस सुरू असल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि तो जिन्यावरून खाली कोसळला.

घटनेनंतर कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी त्याला तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेनंतर महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शहरात यापूर्वीही विजेचा शॉक लागून अनेक दुर्घटना घडल्या असतानाही जीर्ण झालेल्या तारा, सैल वायर आणि धोकादायक वीज यंत्रणेची वेळेवर दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे शहरातील अनेक भागांत तसेच महाविद्यालय परिसरालगत उच्चदाब वीजवाहिन्या आणि मुख्य वीजपुरवठा वाहिन्या घरांच्या अत्यंत जवळून जात आहेत. पावसाळ्यात यामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

लोकेश जडे यांच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांनी संपूर्ण शहरातील वीज यंत्रणेचे तातडीने सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. कट झालेल्या सर्व्हिस वायर, जीर्ण तारा, धोकादायक खांबे आणि घरांजवळून जाणाऱ्या वीजवाहिन्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अवघ्या २३ वर्षांच्या तरुणाचा झालेला दुर्दैवी मृत्यू जडे कुटुंबासाठी मोठा धक्का ठरला असून या घटनेमुळे संपूर्ण पाचोरा शहरात शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---