युवा सहकार नेते रोहित निकम यांची महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन सहकारी शिखर संस्थेच्या (पणन महासंघ) अध्यक्षपदी निवड….!

---Advertisement---

 

खानदेशातील शेतकरी कुटुंबातून आलेले युवा सहकार नेते रोहित दिलीपराव निकम यांची महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन सहकारी शिखर संस्थेच्या (पणन महासंघ) अध्यक्षपदी तर राहुल काकडे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या ७० वर्षानंतर प्रथमच या महत्त्वाच्या सहकारी संस्थेच्या नेतृत्वाची धुरा भारतीय जनता पक्षाशी संबंधित नेतृत्वाकडे आली असून, सहकार क्षेत्रात याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

मुंबई येथील पणन महासंघाच्या मुख्यालयात गुरुवारी सकाळी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत रोहित निकम यांची अध्यक्षपदी आणि राहुल काकडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सह निबंधक, सहकारी संस्था मुंबईचे शाहजी पाटील यांनी कामकाज पाहिले.

निवडीनंतर बोलताना रोहित निकम यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पणन मंत्री जयकुमार रावल, मंत्री हसन मुश्रीफ तसेच भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन , भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण 

आणि मंत्री संजय सावकारे यांचे आभार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, माझ्यावर दाखविण्यात आलेला विश्वास सार्थ ठरवत शेतकरी हित, सहकार क्षेत्राची मजबुती आणि पारदर्शक व गतिमान प्रशासन यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करणार आहे. ‘सहकार से समृद्धी’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी महासंघाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न राहील.

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ही राज्यातील सर्व खरेदी विक्री शेतकरी संघ व पणन प्रक्रिया, सहकारी संस्थांची शिखर संस्था असून राज्यातील कृषी उत्पादनांचे विपणन, साठवणूक, खरेदी-विक्री आणि शेतकरी हिताच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणारी महत्त्वाची संस्था मानली जाते. त्यामुळे अध्यक्षपदाची जबाबदारी ही केवळ प्रशासकीय नसून राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या हिताशी निगडित असल्याचे मानले जाते. अशा परिस्थितीत शेतकरी कुटुंबातील आणि सहकार क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या रोहित निकम यांच्या निवडीकडे आशेने पाहिले जात आहे.

रोहित निकम यांनी आजोबा बॅरिस्टर देवराव निकम आणि वडिलांचा सहकार क्षेत्रातील वारसा पुढे नेत विविध संस्थांमध्ये नेतृत्वाची भूमिका बजावली आहे. सध्या ते जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक असून जळगाव जिल्हा कृषी उद्योग व सर्व सेवा सहकारी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. याशिवाय ते भाजप सहकार आघाडी, महाराष्ट्र राज्यचे सहसंयोजक म्हणूनही कार्यरत आहेत. सहकार, कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील त्यांचा अनुभव पणन महासंघाच्या कामकाजाला नवी गती देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या निवड प्रक्रियेवेळी संस्थेचे संचालक वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी आमदार जयंत पाटील, संचालक संजय पवार, अतुल गण्यारपवार, सुभाष रघातटे, रमेश हिंगणकर, नितीन हिवसे, सुनील चव्हाण, पांडुरंग घुगे, राहुल काकडे, संदीप नरके, प्रमोद रावराणे, आबासाहेब पाटील, बळवंत पाटील, धनश्रीदेवी घाटगे, अयोध्या धस, अशोक हटकर, दत्तात्रय पानसरे यांच्यासह पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक राहुल कुलकर्णी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

राज्यातील सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाचा उदय आणि शेतकरी केंद्रित धोरणांना बळ देण्याच्या दृष्टीने रोहित निकम यांची अध्यक्षपदी झालेली निवड महत्त्वपूर्ण मानली जात असून, आगामी काळात पणन महासंघाच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या अधिक प्रभावी योजना आणि उपक्रम राबविले जातील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---