---Advertisement---
रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत दोन सराईत मोटारसायकल चोरांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत केल्या असून त्यापैकी एक दुचाकी रावेर शहरातील मराठा मंगल कार्यालयाजवळून चोरीस गेली होती. या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
फिर्यादी अतुल अर्जुन महाजन (रा. कुसुंबा, ता. रावेर) हे २३ जून रोजी दुपारी रावेर शहरातील मराठा मंगल कार्यालय येथे लग्न समारंभासाठी गेले होते. लग्न समारंभसंपल्यानंतर ते आपली मोटारसायकल घेण्यासाठी गेले असता त्यांना त्यांची काळ्या रंगाची होंडा कंपनीची युनिकॉन मोटारसायकल क्रमांक एमएच-१९-डीटी-७१११ जागेवर आढळून आली नाही. त्यांनी परिसरात शोध घेतला तसेच आजूबाजूच्या नागरिकांकडे चौकशी केली, मात्र दुचाकीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने दुचाकी चोरी केल्याचा संशय आल्याने त्यांनी रावेर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रावेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. रावेर शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. मात्र आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने त्यांची ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचे फुटेज आणि चोरी झालेल्या दुचाकीचे फोटो विविध गावांतील व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून प्रसारित केले. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोरीची दुचाकी खानापूर येथील दोन इसमांकडे काही तासांपूर्वी दिसून आल्याचे समोर आले. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिस पथकाने खानापूर येथे जाऊन संशयितांचा शोध घेतला. पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता संशयितांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींनी चोरी केलेली दुचाकी बऱ्हाणपूर रोडवरील हॉटेल काकाश्रीच्या मागील बाजूस असलेल्या वनराईमधील एका पाटचारीत लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तपास केला असता दोन चोरीच्या मोटारसायकली आढळून आल्या. यामध्ये मराठा मंगल कार्यालयाजवळून चोरीस गेलेली होंडा युनिकॉन तसेच दुसरी हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी समाधान उर्फ शंभू रमेश जाधव (वय ३३) आणि मनोज भागवत चंदनकर (वय ३१), दोन्ही रा. खानापूर, ता. रावेर, जि. जळगाव यांना अटक केली आहे. आरोपींकडून १५ हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची युनिकॉन मोटारसायकल (एमएच-१९-डीटी-७१११) तसेच १० हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची सोंडर मोटारसायकल असा एकूण २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपींकडे सखोल तपास सुरू असून त्यांच्या चौकशीतून आणखी काही मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक संदीप गावीत, फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण आणि सुकेश तडवी यांनी या कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान ठाकूर करीत आहेत.









