---Advertisement---
महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये माध्यमांना प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीवर आणि विरोधी पक्षातील नेत्यांवर जोरदार टीका केली. ऑपरेशन 3.0, उद्धव ठाकरे यांचा दौरा, पत्रकारांवरील हल्ला, आदित्य ठाकरे यांची मिमिक्री आणि काँग्रेसच्या राजकीय स्थितीवर त्यांनी परखड भूमिका मांडली.
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी फिरलेच पाहिजे. मुलाने केले नाही तर बापाने ते केलेच पाहिजे,” असा टोला त्यांनी लगावला.
संजय दिना पाटील आणि पत्रकार यांच्या वादावर प्रतिक्रिया देताना त्यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे सांगितले. “पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आहे. तो आपला आरसा आहे. आरशाला दगड मारू नये. मतभेद असू शकतात, पण मारामारी किंवा शिवीगाळ योग्य नाही. संबंधितांनी ‘सॉरी’ म्हणायला काही हरकत नाही. ‘क्षमस्व, वीरस्य भूषणम्’,” असे ते म्हणाले.
संजय पाटील यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “सुरक्षा कोणाला द्यायची हे पक्ष ठरवत नाही, तो निर्णय गृह विभाग घेतो. तेवढेही डोकं नसेल तर देव त्यांचं कल्याण करो,” अशी टीका त्यांनी मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर केली.
मात्र, ‘ऑपरेशन 3.0’ बाबत मोठा गौप्यस्फोट करताना गुलाबराव पाटील म्हणाले, “ऑपरेशन 3.0 ला सुरुच आहे. थोडं थांबा, 14 पेक्षा जास्त आमदार आमच्यासोबत येतील. एकनाथ शिंदे बोलत नाहीत, फक्त दाढीवर हात फिरवतात आणि तेव्हाच ऑपरेशन यशस्वी होतं. हे स्वतः आदित्य ठाकरे यांनी कबूल केलं आहे,” असा दावा त्यांनी केला.
आदित्य ठाकरे यांच्या मिमिक्रीवरही त्यांनी खोचक टिप्पणी करत “मिमिक्री करण्यासाठी आवाज लागतो. आधी आवाज सुधारा, मग मिमिक्री करा. गुलाबसारखा आवाज लागतो,” असा टोला लगावला.
काँग्रेसचा फोटो वापरून निवडून आल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले, “कोण कोणाचा फोटो वापरेल याची गॅरंटी नाही. आता काँग्रेसचीच गॅरंटी राहिलेली नाही,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, विशेषतः ‘ऑपरेशन 3.0’ आणि 14 हून अधिक आमदार सत्ताधारी गटात येणार या दाव्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.









