पाचोरा : पुण्यात नोकरी करत असलेल्या एका २८ वर्षीय तरुणाने पाचोरा तालुक्यातील आपल्या बाळद बुद्रूक येथील शेतात येऊन झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधान पाटील असे या मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात आणि गावात शोककळा पसरली आहे.
समाधान पाटील हा पुण्यात नोकरी करत होता. तो आज सकाळी पुण्याहून थेट आपल्या गावी पाचोरा येथे आला. गावाजवळील शेतात जाऊन त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. समाधानने आत्म हत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मि ळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल हरीश अहिरे हे करीत आहेत. अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन नोकरीला लागलेल्या मुलाने असा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. समाधानच्या पश्चात त्याचे आई-वडील आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे.
