जळगावात पुन्हा भोंदूबाबाचा कारनामा! “तुमच्यावर शनीची महादशा, तुमचा शनी काढून देतो” म्हणत वृद्धाची फसवणूक…!

---Advertisement---

 

जळगावात भोंदूबाबांकडून नागरिकांची फसवणूक करण्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. “तुमच्यावर शनीची महादशा आहे, मोठं नुकसान होईल” अशी भीती दाखवत दोन भामट्यांनी एका वृद्धाची सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना नवीन बसस्थानक परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जिल्हा बँक कॉलनीतील रहिवासी गजानन विठोबा सर्जेराव (वय ६७) हे २० एप्रिल रोजी पहाटे सुमारे ४ वाजता बसची वाट पाहत नवीन बसस्थानकात थांबले होते. यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अंगावर शनीची छाया असल्याचे सांगून भीती निर्माण केली. “आम्ही तुमचा शनी उतरवतो” असे सांगत त्यांनी विश्वास संपादन केला.
भामट्यांनी हातचलाखीचा वापर करत रस्त्यावरचा खडा उचलायला सांगितला आणि “राम राम राम” म्हणत मूठ उघडताच खड्याऐवजी रुद्राक्ष दाखवून सर्जेराव यांचा विश्वास जिंकला. त्यानंतर पुढील पूजा करण्यासाठी त्यांनी सर्जेराव यांच्याकडील साडेचार ग्रॅम सोन्याची अंगठी आणि ९०० रुपये घेतले.

यानंतर दोघांनी सर्जेराव यांना बसस्थानकातील बंद पोलिस चौकीजवळ नेऊन मागे न पाहता पुढे जाण्यास सांगितले. काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले असता दोन्ही भामटे पसार झाल्याचे लक्षात आले.

फसवणूक झाल्याचे समजताच सर्जेराव यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अशा प्रकारच्या भोंदूबाबांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---