---Advertisement---
मुंबई (प्रतिनिधी):
राज्यात १ मेपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बंधनकारक करण्याच्या निर्णयावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आक्षेप घेतला आहे. भाषा शिकणे आवश्यक असले तरी ती सक्तीने नव्हे, तर प्रेमाने आत्मसात व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
परिवहन विभागाच्या नव्या नियमानुसार चालकांची मराठी वाचन-लेखन क्षमता तपासली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक रिक्षा-टॅक्सी चालकांनी रामदास आठवले यांची भेट घेऊन परवाना रद्द होण्याच्या भीतीबाबत चिंता व्यक्त केली. “परवाना गेला तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार?” हा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
रामदास आठवले म्हणाले, महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी भाषा अवगत असणे महत्त्वाचे आहे, मात्र त्यासाठी सक्ती करणे योग्य नाही. मराठीमुळे प्रवाशांशी संवाद सोपा होतो, पण हा आग्रह प्रेमाचा असावा.
त्यांनी पुढे सांगितले की, रिक्षा-टॅक्सी चालक बहुतेक कष्टकरी वर्गातील असून अनेकांनी कर्ज काढून वाहन घेतलेले असते. अशा वेळी कठोर कारवाई केल्यास त्यांच्या कुटुंबांवर परिणाम होऊ शकतो. तसेच भाषेच्या मुद्द्यावरून उपजीविकेचे साधन हिरावून घेणे संविधानिक तत्त्वांनाही विरोधात जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) कष्टकरी वर्गाच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असेही त्यांनी सांगितले. चालकांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न करावा, मात्र सरकारने दंडात्मक कारवाईऐवजी प्रशिक्षणावर भर द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
“भाषा ही जोडण्यासाठी असते, तोडण्यासाठी नाही,” असा संदेश देत रामदास आठवले यांनी संतुलित भूमिका मांडली.









