---Advertisement---
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जळगाव सुवर्णनगरीत सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानल्या जाणाऱ्या या दिवशी सोनं-चांदी खरेदी करण्याला विशेष महत्त्व असल्याने सकाळपासूनच सराफ बाजार गजबजलेला दिसत आहे.
अक्षय तृतीया हा सण समृद्धी आणि शुभारंभाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी खरेदी केलेले सोने-चांदी ‘अक्षय’ म्हणजेच कधीही न संपणारे धन मानले जाते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्राहक मोठ्या उत्साहाने खरेदी करताना दिसत आहेत.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. तरीदेखील या वाढलेल्या दराचा खरेदीवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. ग्राहकांनी पारंपरिक श्रद्धा आणि शुभ मुहूर्त लक्षात घेऊन खरेदीस प्राधान्य दिले आहे.
आज जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याचा दर प्रति तोळा सुमारे 1 लाख 52 हजार 800 रुपये असून, जीएसटीसह हा दर 1 लाख 57 हजार 384 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तसेच चांदीचा दर प्रति किलो 2 लाख 60 हजार रुपये असून, जीएसटीसह तो 2 लाख 67 हजार 800 रुपयांवर पोहोचला आहे.
सोने व्यावसायिकांच्या मते, दर वाढले असले तरी अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करण्याची परंपरा कायम असल्यामुळे बाजारात चांगली उलाढाल होत आहे. विशेषतः लहान दागिने, नाणी आणि चांदीच्या वस्तूंना अधिक मागणी असल्याचेही दिसून येत आहे.









