---Advertisement---
चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, त्यांना नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जारी केले.
चोपडा येथे गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ विविध हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या निलंबनाची मागणी केली होती. या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाने तातडीने बदलीची कारवाई केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गो-वंश तस्करीच्या संशयावरून रामपूरा परिसरात गोरक्षकांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर गोरक्षक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता, त्यांच्याशी गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आंदोलन उभारण्यात आले होते.
राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी या प्रकरणाची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधत या प्रकरणात चौकशी करून कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते.
या घटनेनंतर पोलीस विभागात हालचालींना वेग आला असून, गेल्या दोन दिवसांत दोन पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. यापूर्वी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी कावेरी कमलाकर यांनाही नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले होते. तसेच, पवन देसले यांच्या बदलीनंतर शहर वाहतूक शाखेची जबाबदारी आता पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.









