---Advertisement---
महिला सशक्तीकरण आणि फिटनेसला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 7 दिवसीय झुंबा फिटनेस व डान्स शिबिराचा उत्साहात समारोप झाला. नारीशक्ती बहुद्देशीय संस्था आणि ड्रॅगन्स डान्स फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन महापौर सौ. दीपमाला काळे यांच्या हस्ते पार पडले होते. समारोप सोहळ्याला माजी महापौर जयश्री महाजन, सिंधुताई कोल्हे, श्रद्धा नखाते, डॉ. नीलिमा सेठीया आणि अभिलाषा चराटे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनिषा पाटील यांनी प्रास्ताविकातून शिबिराच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला, तर तुषार वाघुळदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मंचावर नारीशक्तीच्या मनिषा पाटील, ड्रॅगन्स डान्स अँड फिटनेसच्या डॉली आनंदकुमार आणि मुख्य प्रशिक्षक बी. आनंदकुमार उपस्थित होते.
या 7 दिवसीय शिबिरात सहभागी महिलांना बॉलीवूड डान्स, झुंबा फिटनेस, एरोबिक्स, योग्य आहार, वजन कमी करणे (वेट लॉस) आणि इंचेस लॉस याबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. प्रशिक्षक डॉली आनंदकुमार आणि बी. आनंदकुमार यांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण देत महिलांना फिटनेसबाबत जागरूक केले.
या शिबिरात एकूण 200 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिरादरम्यान उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या सहभागी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तेजल वनरा, रंजिता सोनार, नीता पाटील, भावना पाटील, रेणुका हिंगु, आशा मौर्य, नेहा मौर्य, राधिका पाटील, पूर्णिमा धांडे, दिशा ठाकूर, श्रावणी पाटील, मोनिका तळेले आणि जयश्री पाटील यांनी विशेष कामगिरी केली.









