अमळनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, आ. अनिल पाटील यांचे तहसीलदारांना आदेश

---Advertisement---

 

अमळनेर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आणि जोरदार वादळी वाऱ्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याच्या सूचना माजी मंत्री तसेच आमदार अनिल पाटील यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या प्रकरणी आमदार अनिल पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याशीही संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची बिकट अवस्था मांडत शासनाने त्वरित मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये २ तारखेला सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. चिमनपुरी, पिंपळे खुर्द, पिंपळे बुद्रुक, अटाळे, शिरसाळे, आर्डी, अनोरे, जवखेडा, नीम, पाडळसरे, कळमसरे, बोहरा, मांडळ, वावडे, मारवड तसेच तासखेडा, आमोदे, अंतुर्ली, रंजाणे आणि बोरी काठावरील इतर गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर होता.

या नैसर्गिक आपत्तीमुळे मका, बाजरी, ज्वारी, गहू आणि इतर पिके आडवी पडली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी काढणीसाठी तयार झालेली किंवा कापून ठेवलेली पिके पावसाच्या पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परिणामी, शेतकरी हतबल झाले असून शासनाकडून तातडीची मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---