---Advertisement---
ज्वारीसारखे पारंपरिक आणि पौष्टिक धान्य आता महागाईच्या शर्यतीत गव्हालाही मागे टाकताना दिसत आहे. राज्यातील मराठवाडा भागात ज्वारीचे उत्पादन घटल्यामुळे यंदा बाजारात आवक कमी झाली आहे. परिणामी ज्वारीच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून, अनेक ठिकाणी ती गव्हापेक्षाही महाग विकली जात आहे. त्यामुळेच सध्या जिल्ह्यात “पोळी स्वस्त आणि भाकर महाग” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या स्थानिक बाजारात ज्वारीचा दर साधारण ३० ते ३५ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. तर विदर्भातील काही भागांमध्ये, विशेषतः भंडारा आणि अकोला जिल्ह्यात, ज्वारीचे दर ४५ ते ६० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. याउलट नवीन गहू २२ ते २५ रुपये किलो दराने उपलब्ध असल्यामुळे गव्हाची पोळी तुलनेने स्वस्त ठरत आहे.
ज्वारीच्या वाढत्या दरामागे उत्पादनात झालेली घट हे मुख्य कारण मानले जात आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड होत होती. त्या काळात शेतकऱ्यांकडे जनावरांची संख्या अधिक असल्याने चाऱ्यासाठी ज्वारी पेरली जात होती. मात्र, बदलत्या शेती पद्धतींमुळे आणि नगदी पिकांकडे वाढलेल्या कलामुळे ज्वारीचा पेरा लक्षणीय घटला आहे.
यामुळे आजच्या घडीला जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन जवळपास नगण्य झाले असून, बाहेरील भागातून ज्वारीची आयात करावी लागत आहे. परंतु, मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे भाव वाढत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, ज्वारीला मिळणाऱ्या वाढत्या मागणीमागे तिची पोषणमूल्येही कारणीभूत आहेत. ज्वारीमध्ये फायबर, प्रोटीन आणि इतर सूक्ष्म पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे पचनासाठी हलकी असणारी ज्वारी उन्हाळ्यात विशेषतः जास्त प्रमाणात खाल्ली जाते. नियमित आहारात ज्वारीचा समावेश केल्यास वजन नियंत्रणात राहते, तसेच मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.
आरोग्याबाबत जागरूकता वाढल्यामुळे शहरी भागातही ज्वारीच्या भाकरीकडे लोकांचा कल वाढत आहे. फिटनेससाठीही अनेकजण ज्वारीचा आहारात समावेश करत आहेत. त्यामुळे मागणी सातत्याने वाढत आहे.
स्थानिक बाजारात कठाणी ज्वारीला सध्या सुमारे ३५ रुपये किलो दर मिळत आहे, तर दादर ज्वारीचा दर ६० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वाढत्या मागणीमुळे येत्या काळात दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









