सबगव्हाण टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; महिलेसह कुटुंबावर प्राणघातक हल्ला; सीसीटीव्हीत धक्कादायक प्रकार कैद…!

---Advertisement---

 

जळगावहून धुळ्याकडे जाणाऱ्या एका कुटुंबावर सबगव्हाण टोल नाक्यावर निर्घृण हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून टोल कर्मचाऱ्यांनी महिलांसह कुटुंबीयांवर लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरात राहणारी महिला आपल्या दोन मुलांसह नातेवाईकांना भेटण्यासाठी धुळे येथे रविवारी दुपारी कारने निघाली होती. पारोळा ते सबगव्हाण दरम्यानच्या टोल नाक्यावर पोहोचताच फास्टॅगमुळे टोल आपोआप भरला गेला असे समजून चालकाने गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक टोलचा बूम कारच्या बोनेटवर कोसळल्याने वादाची ठिणगी पडली.

याबाबत विचारणा करण्यासाठी कुटुंबातील सदस्य खाली उतरले असता टोल कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी धक्काबुक्की केली. वाद वाढताच महिलांसह कुटुंबातील इतर सदस्य मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले. याच दरम्यान टोल नाक्यावरील १० ते १२ कर्मचाऱ्यांनी एकत्र येत लाठ्या-काठ्या आणि इतर वस्तूंनी कुटुंबीयांवर हल्ला चढवला.

या मारहाणीत दोन महिलांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या पाय व कमरेवर वार झाल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे, तर महिलांशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. घटनेदरम्यान महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिनेही गहाळ झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात टोल नाक्यावरील व्यवस्थापकासह काही कर्मचाऱ्यांविरोधात मारहाण, विनयभंग आणि चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. किरकोळ वादातून घडलेल्या या प्रकारामुळे टोल नाक्यावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---