---Advertisement---
सोयगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक वर्षांपासून बंद असलेले शेतरस्ते महसूल प्रशासनाच्या पुढाकाराने मोकळे करण्यात आले.तहसीलदार मनिषा मेने यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
तहसील कार्यालय, सोयगाव येथे मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ च्या कलम ५ नुसार प्राप्त आदेशानुसार जरंडी येथील गट क्रमांक १२३ मधील खातेदार अमरसिंग हिरालाल परदेशी यांचा दोन ते तीन वर्षांपासून अडविण्यात आलेला रस्ता मोकळा करण्यात आला.
तसेच सोयगाव येथील गोपाल चौधरी व त्र्यंबक चौधरी यांच्या मालकीच्या गट क्रमांक ४० मध्ये जाण्यासाठीचा रस्ता खुला करण्यात आला. वेताळवाडी येथील गट क्रमांक ४३ मधील देविदास विष्णू सोनवणे व सिद्धार्थ विष्णू सोनवणे यांच्या शेतात जाण्याचा मार्गही मोकळा करण्यात आला. यानंतर धनवट येथील गट क्रमांक ७३/अ मुलचंद झिपरू जाधव यांच्या शेतात जाणारा दोन वर्षांपासून बंद असलेला रस्ता प्रशासनाने खुला केला.
या कारवाईमुळे परिसरातील सुमारे ३० ते ३५ शेतकऱ्यांना थेट लाभ होणार असून शेतीकामासाठीचा मार्ग सुकर झाला आहे.
कारवाईदरम्यान नायब तहसीलदार संभाजी देशमुख, मंडळ अधिकारी अरुण पंडीत, मंडळ अधिकारी कल्पना डिघोळे, ग्राम महसूल अधिकारी वैभव जाधव, संतोष राऊत, शिल्पा बोपटे, भगवान सोळुंके तसेच महसूल सेवक संभाजी बोरसे उपस्थित होते.









