शहादा-मंदाणे मार्गावर भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…!

---Advertisement---

 

शहादा-मंदाणे रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असून डोंगरगावजवळ झालेल्या भीषण अपघातात कवळीथ येथील 53 वर्षीय रावण हंबर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रावण पाटील हे शहादा येथे काम आटोपून दुचाकी क्रमांक एमएच 18 टी 5122 ने आपल्या कवळीथ गावाकडे परतत होते. दुपारी सुमारे 12 वाजेच्या सुमारास डोंगरगावजवळील खडी मशीनसमोर केळी घेऊन शहाद्याकडे येणाऱ्या मालवाहतूक पिकअप क्रमांक एमएच 39 एडी 2411 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातात वाहनाचे चाकही निखळून दूर फेकले गेले. गंभीर जखमी झालेल्या रावण पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.

मृत रावण पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. विशेष म्हणजे, सहा दिवसांपूर्वीच कवळीथ गावातील एका तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे अवघ्या आठवडाभरात गावातील दोन व्यक्तींना अपघातात जीव गमवावा लागल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

शहादा-मंदाणे मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असूनही सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---