---Advertisement---
नंदुरबार जिल्ह्यात खत विक्रीतील मोठा घोटाळा उघडकीस आला असून तब्बल 1 हजार 30 शेतकऱ्यांच्या नावावर बोगस खत विक्री झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकरणामुळे कृषी विभागात खळबळ उडाली असून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तात्काळ झाडाझडती मोहीम सुरू केली आहे.
कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातल्या संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात पीक लागवडीचा कालावधी नसतानाही त्यांच्या नावावर खत खरेदी दाखवण्यात आली आहे. त्यामुळे ही विक्री नेमकी कशी झाली, याचा तपास सध्या सुरू आहे.
१ एप्रिलपासून आतापर्यंत जिल्ह्यातील 102 कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच, ज्या 1 हजार 30 शेतकऱ्यांच्या नावावर जास्तीची खत उचल दाखवण्यात आली आहे, त्यांच्या पडताळणीचे कामही सहायक कृषी अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.
तपासणीदरम्यान खत विक्रीत गंभीर अनियमितता आढळून आली असून संबंधित विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई होण्याचे संकेत कृषी विभागाने दिले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात खतांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एका महिन्यात झालेली बोगस विक्री कृषी विभागासाठी मोठे आव्हान ठरत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे. शेतकरी 18002334000 या टोल-फ्री क्रमांकावर तसेच 9822446655 या व्हॉट्सऍप क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात.
नंदुरबार जिल्हा स्तरावरही तक्रार निवारण सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, 9404110878 आणि 7588763089 या क्रमांकांवर शेतकरी संपर्क साधू शकतात. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या पीक क्षेत्रानुसारच खत खरेदी करावी आणि ई-पॉस मशीनद्वारे अधिकृत कृषी सेवा केंद्रातूनच व्यवहार करावा.









