---Advertisement---
नवी दिल्ली : काही दिवसांतच आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करणार आहोत. गौतम बुद्धांचे विचार आणि त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच समर्पक आहे. त्यांनी जगाला शांतीचा मार्ग सांगितला आहे. आजच्या तणाव आणि संघर्षाच्या काळात बुद्धांचे विचारच जगात शांतता निर्माण करू शकतात, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.
आकाशवाणीवर प्रसारित ‘मन की बात’च्या १३३ व्या भागात संबोधित करताना मोदी म्हणाले, भारत नेहमीच शांततेचा पुरस्कर्ता राहिलेला आहे. भगवान बुद्धांच्या विचाराने जगात शांततेचा मार्ग प्रशस्त होईल. आज भारत पवन ऊर्जेमध्ये वेगाने प्रगती करत आहे आणि त्यामुळेच आज आपला देश पवन ऊर्जा क्षेत्रात जगात चौथ्या स्थानी आहे. देशाची पवन ऊर्जा क्षमता ५६ गिगावॅटपेक्षा जास्त झाली आहे.
गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान यांसारखी देशातील अनेक राज्ये या क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवत आहेत. गुजरातच्या कच्छ, पाटन, बनासकांठा यांसारख्या क्षेत्रांमध्ये, जिथे पूर्वी फक्त वाळवंट दिसत होते. आज तिथे मोठे अक्षय ऊर्जा पार्क (रिन्यूएबल एनर्जी पार्क) तयार होत आहेत. भारताची खाद्य परंपरा केवळ चवीपुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या संस्कृती आणि ओळखीचाही एक भाग आहे. भारतीय पनीर (चीज) या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. ब्राझीलमध्ये नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय पनीर स्पर्धेत भारतीय पनीर बँड्सनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले. पंतप्रधानांनी संपूर्ण ईशान्य भारतात बांबू क्षेत्र भरभराटीस येत असल्याचे सांगितले.
जनगणना देशाची सामायिक जबाबदारी
जनगणनेचा पहिला टप्प्या सुरू झाला आहे. आतापर्यंत १.२ कोटी कुटुंबांसाठी हे काम पूर्ण झाले आहे. जनगणना हे केवळ सरकारचे काम नसून संपूर्ण देशाची सामायिक जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. जनतेने २०२७ ची जनगणना यशस्वी करण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.









