---Advertisement---
ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाल्याने सराफा बाजारात खळबळ उडाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मौल्यवान धातूंच्या किमती कमी झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात तब्बल २ हजार रुपयांची घट झाली असून चांदीचे दर ८ हजार रुपयांनी खाली आले आहेत.
सोन्या चांदीच्या ताज्या दरांनुसार, सोन्याचे भाव १ लाख ५५ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर २ लाख ६५ हजार रुपयांवर आले आहेत. लग्नसराई आणि गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर या घसरणीकडे ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे विशेष लक्ष लागले आहे.
जळगाव सुवर्णनगरीतील सराफा व्यावसायिकांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. जागतिक स्तरावरील या घडामोडींचा परिणाम थेट सोन्या-चांदीच्या दरांवर होत असल्याचे सांगितले जात आहे.
तर गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांच्या बदलत्या भूमिकेमुळे सराफा बाजारात अस्थिर वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळातही सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, दर घसरल्यामुळे ग्राहकांकडून खरेदी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.









