---Advertisement---
काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या COVID-19 महामारीनंतर आता पुन्हा एका नव्या विषाणूमुळे चिंता वाढू लागली आहे. सध्या हंता व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या बातम्या समोर येत असून नागरिकांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
यावर्षी एप्रिल महिन्यात अर्जेंटीनामधून निघालेल्या एका क्रूज जहाजावर हंता व्हायरसचे रुग्ण आढळून आले. या जहाजावर एकूण १०८ प्रवासी होते, त्यापैकी ८ जणांना संसर्ग झाल्याचं समोर आलं. दुर्दैवाने या संक्रमितांपैकी तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर अनेक देशांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे. मात्र WHO च्या तज्ज्ञांनी सध्या घाबरण्याचं कारण नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हा आजार अद्याप मोठ्या प्रमाणावर पसरलेला नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलं आहे.
WHO च्या तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हंता व्हायरसचा प्रसार मुख्यतः उंदरांच्या मल-मूत्रातून होतो. संक्रमित जागांमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो. विशेषतः ध्रुवीय प्रदेश किंवा ज्या देशांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव अधिक आहे, त्या भागात प्रवास करताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
WHO ने नागरिकांना सध्या अनावश्यक घबराट न पसरवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अशा भागात प्रवास टाळावा, जिथे संसर्गाचा धोका अधिक आहे. प्रवासादरम्यान स्वच्छता, मास्क आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
हंता व्हायरसवर अद्याप कोणतीही अधिकृत लस किंवा ठोस उपचार उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. यावर संशोधन सुरू असून तज्ज्ञ परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कोरोनानंतर पुन्हा एका विषाणूची चर्चा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली असली तरी सध्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती नसल्याचं आरोग्य तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.









