---Advertisement---
देशासमोर उभ्या राहिलेल्या युद्धामुळे जागतिक आर्थिक आणि तेलसंकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मोठं आवाहन केलं आहे. हैदराबाद येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले. यासोबतच पेट्रोल-डिझेल आणि खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचाही सल्ला त्यांनी नागरिकांना दिला.
अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभरात तेल आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खतांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. या संकटाचा परिणाम भारतावरही होत असल्याने देशहितासाठी प्रत्येक नागरिकाने काही जबाबदाऱ्या स्वीकारण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं.
हैदराबाद येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “देशासाठी फक्त मरणं हीच देशभक्ती नसते, तर देशासाठी जगणं आणि जबाबदाऱ्या पार पाडणंही देशभक्तीचाच भाग आहे.” त्यामुळे नागरिकांनी इंधनाची बचत करण्यासाठी शक्य तितका सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, कार पूलिंग करावं आणि रेल्वे वाहतुकीला प्राधान्य द्यावं, असं त्यांनी सांगितलं.
याशिवाय कोरोना काळात वाढलेल्या वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन मीटिंग संस्कृतीचा पुन्हा वापर करण्याचं आवाहनही मोदींनी केलं. यामुळे इंधनाची बचत होईल आणि विदेशी मुद्रा खर्च कमी होण्यास मदत होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
नरेंद्र मोदी यांनी विशेषतः सोने खरेदीबाबत मोठं विधान करताना सांगितलं की, “देशहितासाठी पुढील एक वर्ष कोणत्याही कार्यक्रमासाठी सोनं खरेदी न करण्याचा संकल्प करा.” सोने आयातीमुळे मोठ्या प्रमाणात विदेशी मुद्रा खर्च होत असल्याने हा निर्णय देशाच्या आर्थिक हितासाठी महत्त्वाचा ठरेल, असं त्यांनी नमूद केलं.
खाद्यतेलाच्या वाढत्या आयातीबाबतही चिंता व्यक्त करत त्यांनी प्रत्येक कुटुंबाने तेलाचा वापर काही प्रमाणात कमी करण्याचं आवाहन केलं. “यामुळे देशसेवा आणि आरोग्यसेवा दोन्ही होईल,” असंही मोदी म्हणाले. तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं आवाहन करत त्यांनी शेतजमिनी वाचवण्यासोबत विदेशी मुद्रा बचतीवरही भर दिला.
मोदींच्या या आवाहनानंतर देशभरात विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही या वक्तव्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे.









