---Advertisement---
जळगाव शहरात इन्स्टाग्रामवरील प्रेमातून थेट बांगलादेशातून भारतात आलेल्या एका तरुणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विनाविसा भारतात राहत असल्याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेतले असून तिला आश्रय देणाऱ्या युवकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ पोलिसांना भोई गल्ली, जोशी पेठ परिसरात एक परदेशी महिला बेकायदेशीररीत्या राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता २० वर्षीय कोणीका राणी शामलचंद्र राय ही तरुणी आढळून आली.
तपासादरम्यान तिच्याकडे कोणतेही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांच्या चौकशीत ती बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, कोणीका राणी आणि जळगावातील सोने कारागीर चिन्मय जगन्नाथ वाला यांची ओळख इन्स्टाग्रामवरून झाली होती. सोशल मीडियावरील मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि लग्नासाठी कोणीका हिने थेट बांगलादेशातून भारतात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात इमिग्रेशन आणि परदेशी नागरिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कोणीका आणि चिन्मय यांनी आम्ही विवाह केल्याचा दावा केला असला तरी त्याबाबत कोणताही अधिकृत पुरावा अद्याप समोर आलेला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास साजिद मन्सूरी करत असून या घटनेमुळे सोशल मीडियातून वाढणाऱ्या संबंधांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.









