---Advertisement---
चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडवरील १३२ केव्ही सब स्टेशनमध्ये रविवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत मोठ्या प्रमाणात धूर आणि ज्वाळा उसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दुपारी १ वाजेच्या सुमारास हिरापूर रोडवरील १३२ केव्ही सब स्टेशनमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले. यानंतर आगीच्या ठिणग्या खाली असलेल्या गवतावर पडल्याने आग वेगाने पसरली. काही वेळातच कंपाउंडच्या बाहेर ठेवलेल्या लाकडालाही आग लागली आणि परिसर धुराने व्यापून गेला. आगीच्या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक प्रशांत राजपूत यांनी तात्काळ नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर अग्निशमन दलाची दोन वाहने घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी पाण्याच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे.
या आगीमुळे चाळीसगाव तालुक्यातील अनेक भागांतील वीजपुरवठा दीड ते दोन तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता. सुरक्षिततेच्या कारणास्तव वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
घटनास्थळी ग्रामपंचायत सदस्य रजनीकांत पाटील, गजेंद्र विसपुते, माजी उपसरपंच मुराद पटेल, ग्रामपंचायत कर्मचारी किरण देसले तसेच अमन पटेल यांनी मदतकार्य केले. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
नागरिकांनी चाळीसगाव नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या तत्परतेचे कौतुक करत कर्मचाऱ्यांचे आभार मानले. वेळेत आग नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.









