---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात भरधाव रेती डंपरच्या धडकेत एका मोटारसायकलस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घनश्याम तुकाराम पाटील (वय अंदाजे ३५, रा. पवन चौक, मुठे गल्ली) हे मोटारसायकलवरून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या रेतीने भरलेल्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात दगडी दरवाजा ते फरशी पुल या परिसरात घडला. धडक इतकी भीषण होती की घनश्याम पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
मृत घनश्याम पाटील यांच्या पश्चात आई आणि पत्नी असा परिवार आहे. वडिलांचे पूर्वीच निधन झाले असल्याची माहिती मिळाली आहे. घनश्याम पाटील हे यापूर्वी गॅरेजमध्ये काम करत होते. त्यानंतर ते आचारीकडे कामाला असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शहरातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या रेती डंपरच्या बेफाम वाहतुकीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर दिवस-रात्र अंदाजे ५० ते ६० डंपरची ये-जा सुरू असते. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी रेती डंपरची वाहतूक रोखत आंदोलनही केले होते. प्रशासनाने वेळेत कारवाई केली असती तर हा अपघात टळला असता, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून रेती वाहतुकीबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.









