---Advertisement---
जळगाव शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून केवळ ५०० रुपयांच्या वादातून एका तरुणाचा जीव गेला आहे. जैनाबाद परिसरात धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव नितीन नाना काळे, वय ३५ वर्षे असे असून, त्याच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताने नितीनकडे ५०० रुपये मागितले होते. मात्र पैसे देण्यास नकार दिल्यानंतर वाद वाढला आणि संतापाच्या भरात धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात नितीन काळे गंभीर जखमी झाला होता. जखमा इतक्या खोलवर होत्या की त्याच्या पोटातील आतडे बाहेर आले होते. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित श्याम तुकाराम सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, नितीन काळे यांच्या मृत्यूनंतर जळगाव जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात नातेवाईक आणि नागरिकांनी गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता.
या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वीही संशयिताने वाद घालत डोक्यात बिअरची बाटली फोडल्याचा प्रकार केला होता. मात्र त्या वेळी पोलिसांनी दोन दिवसांत त्याला सोडून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांनी पैसे
घेऊन संशयिताला सोडल्याचा गंभीर आरोपही नातेवाईकांनी केला आहे.
या घटनेमुळे शहरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून, केवळ ५०० रुपयांसाठी एका तरुणाचा जीव गेल्याने कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.









