---Advertisement---
सध्या भोंदू बाबा अशोक खरात हे प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे, महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या या भोंदू बाबाचे नवनवीन प्रताप हे दिवसेंदिवस समोर येत आहेत. यातच भोंदू बाबा अशोक खरात चे राजकारण्यांसोबत संबंध होते म्हणूनच त्याचे काळे धंदे सुरू होते असाही आरोप सध्या होत आहे. याबाबत बोलताना भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक खळबळ जनक दावा केलेला आहे.
नाशिक येथील अशोक खरात प्रकरणात भाजपचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धक्कादायक विधान करत प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “भोंदू बाबा अशोक खरातला इतका मोठा राजकीय आश्रय होता की त्याच्यावर कारवाई करण्याचे कोणी धाडसच केले नाही,” असा खळबळजनक आरोप मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी नाशिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न उपस्थित केला असून, “नाशिक पोलिसांच्या नाकाखाली हा सगळा प्रकार सुरू होता. यापूर्वीही तक्रारी होत्या, मग कारवाई का झाली नाही?” असा सवाल उपस्थित केला. “या यंत्रणांची काही जबाबदारी आहे की नाही?” असा मुद्दा मांडला. तसेच, “मी शिर्डीत गुन्हा दाखल केला नसता तर हा प्रकार अजून किती वर्षे सुरू राहिला असता?” असेही त्यांनी बोलताना म्हटले.
राजकीय नेते आणि इतर अधिकाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा या प्रकरणात मूळ जबाबदारी कोणाची होती, याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.









