---Advertisement---
प्रशासकीय वाहनांना घातला घेराव; दोन दिवसांपूर्वी निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने राष्ट्रवादी आक्रमक
सचिवांच्या फोननंतर आंदोलन तात्पुरते मागे; मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यात सरकारी गाड्या फिरू न देण्याचा इशारा
शेतकऱ्यांना २५ टक्के डिझेल पंप राखीव ठेवण्याच्या मागणीसाठी आज जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून बाहेर पडणाऱ्या सर्व शासकीय वाहनांना घेराव घातला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी परिसरात एकच खळबळ उडाली आणि प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली.
खरीप हंगामाची पूर्वतयारी आणि मशागतीची कामे सध्या वेगात सुरू आहेत. दुसरीकडे रब्बी पिकांची मळणीही अंतिम टप्प्यात आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना डिझेलची मोठी गरज भासत आहे. शेतकऱ्यांना डिझेल तुटवडा भासू नये म्हणून २५% डिझेल पंप राखीव ठेवावेत, अशी मागणी राष्ट्रवादीने केली होती. दोन दिवसांपूर्वी तसे निवेदनही देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने यावर कोणतीही हालचाल न केल्याने अखेर आज कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट शासकीय वाहने रोखून धरली.
प्रशासनाला झोपेतून जागे केले!
”जर शेतकऱ्यांना डिझेलच मिळाले नाही, तर खरीप हंगामाची मशागत कशी होणार? रब्बीची मळणी कशी होणार? हा गंभीर प्रश्न प्रशासनाला समजत नाहीये. प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठीच आज आम्ही शासकीय वाहने अडवली. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील.”
- प्रमोद पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), जळगाव.
सचिवांचा फोन आला अन्…
आंदोलनाची तीव्रता वाढल्याने आणि शासकीय वाहनांची कोंडी झाल्याने मुंबईत वरिष्ठ पातळीवर याची दखल घेण्यात आली. मंत्रालयातून थेट सचिव साहेबांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संवाद साधला. “शासन लवकरच शेतकऱ्यांच्या डिझेलबाबत सकारात्मक धोरण तयार करेल,” असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर राष्ट्रवादीने आपले आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले. मात्र, धोरण न ठरल्यास पुढील वेळी प्रत्येक तालुक्यात एकही सरकारी गाडी रस्त्यावर फिरू देणार नाही, असा थेट इशारा कार्याध्यक्ष संग्राम सिंह सूर्यवंशी यांनी दिला.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महानगर कार्याध्यक्ष संग्राम सिंह सूर्यवंशी यांच्यासह अशोक लाडवनजारी, मंगला पाटील, वाय. एस. महाजन सर, मजहरभाई पठाण, सुनील माळी, रमेश पाटील, रिंकू चौधरी, किरण राजपूत, गौरव वाणी, राजू मोरे, आकाश हिवाळे, बोरसे व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









