---Advertisement---
मुंबई : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र संतापाने धुमसत आहे. या क्रूर घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नराधमांविरुद्ध निर्णायक पाऊल उचलले आहे. लैंगिक शोषणातील गुन्हेगारांना भविष्यात कधीही मोकळा श्वास घेता येऊ नये, यासाठी राज्य सरकार चक्क कायद्यातच बदल करणार असून, तसा स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिला आहे.
मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत या संतापजनक घटनेवर सविस्तर चर्चा झाली. वारंवार गुन्हे करूनही पॅरोलवर (पेरॉल) सुटणाऱ्या गुन्हेगारांमुळे समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. नसरापूर प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्यावर यापूर्वीही विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल होते, तरीही तो समाजात उजळ माथ्याने वावरत होता. कायद्यातील याच त्रुटीवर बोट ठेवत, आता लैंगिक शोषणातील गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत पॅरोल मिळू नये, यासाठी विधी व न्याय विभागाने तात्काळ कायद्यात दुरुस्ती करावी, असा निर्देश आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहेत.
तपासासाठी एसआयटी सज्ज
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली असून, आरोपी भीमराव कांबळे सध्या पोलीस कोठडीत आहे. समाजात वावरणाऱ्या अशा लांडग्यांना कायद्याचा कायमचा धाक बसावा आणि त्यांना कारागृहाबाहेर येण्याची कोणतीही संधी मिळू नये, यासाठी सरकारने घेतलेला हा कायदेशीर बदलाचा निर्णय अत्यंत ऐतिहासिक मानला जात आहे. सरकारच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नराधमांना आता जेलमध्येच सडावे लागणार, हे स्पष्ट झाले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
नसरापूरमध्ये शुक्रवारी (१ मे) एका साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून दगड मारून तिची निघृण हत्या करण्यात आली होती. नराधमाने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून क्रूरतेची परिसीमा ओलांडली होती. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला होता. सोलापूरपासून पुण्यापर्यंत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत.









