---Advertisement---
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भुसावळ उपविभागीय पोलिसांनी धडक ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवत गुन्हेगारी प्रवृत्तींवर कडक कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेत बाजारपेठ पोलिसांनी आर्म ऍक्ट व चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तब्बल 14 सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. तसेच 2 फरार आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये समीर शहा जब्बार शहा उर्फ डमरू आणि केवल अनिल टाक (दोन्ही रा. भुसावळ) यांचा समावेश आहे. हे दोघेही विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते. त्यांच्या अटकेमुळे प्रलंबित गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तपासणीदरम्यान चार रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या नियोजनबद्ध आणि आक्रमक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी हालचालींवर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.
ही संपूर्ण मोहिम विभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सहायक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांनी मोहिमेचे नेतृत्व केले. तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, कांतीलाल केदारे, महेंद्र पाटील, हर्षल महाजन, जीवन काकडे, चंद्रकांत रायपूरकर, दिलीप कोल्हे, अक्षय कोतकर, अमर अढाळे, जावेद शहा, भूषण चौधरी, प्रशांत सोनार आदींच्या पथकाने सक्रिय सहभाग नोंदवला.
सणासुदीच्या काळात नागरिकांनी निर्धास्तपणे उत्सव साजरे करावेत, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे









