गरोदर महिलेच्या चुकीच्या HIV रिपोर्टमुळे खळबळ; कुटुंबावर मोठा मानसिक आघात, आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित..!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणामुळे एका गरोदर महिलेला चुकीचा HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट देण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. या चुकीच्या अहवालामुळे संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला आहे.

नशिराबाद येथील संबंधित महिला नियमित तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली होती. आवश्यक रक्त तपासणीनंतर तिला HIV पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट देण्यात आला. हा अहवाल मिळाल्यानंतर महिलेसह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. काही काळ त्या कुटुंबाला तीव्र मानसिक तणावाचा सामना करावा लागला.

मात्र, या गंभीर प्रकाराबाबत शंका निर्माण झाल्यानंतर कुटुंबीयांनी शंकेच निरसन करण्यासाठी खासगी लॅबमध्ये पुन्हा तपासणी केली. या तपासणीत संबंधित महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. यामुळे आधी दिलेला अहवाल चुकीचा असल्याचे उघड झाले आहे.

या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही संबंधित प्रयोगशाळेविरोधात तक्रारी आल्याची माहिती समोर येत आहे. रिपोर्ट उशिरा देणे, चुकीचे अहवाल देणे आणि नमुने हरवणे अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

या प्रकरणाला काही दिवस उलटूनही संबंधितांवर ठोस कारवाई झालेली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नागरिकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---