दुहेरी हत्याकांडाने साक्रीत संताप; “न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही” आरोपीला फाशीच्या शिक्षेची जोरदार मागणी, भाडणे ते तहसील कार्यालय मूकमोर्चा…!

---Advertisement---

 

संपूर्ण धुळे जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ साक्री तालुक्यात संतापाची तीव्र लाट उसळली असून मोठ्या संख्येने नागरिकांनी मूकमोर्चा काढत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील वर्धाने आणि उभरांडी शिवारात घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ भाडणे गावासह परिसरातील ग्रामस्थांनी भाडणे ते साक्री तहसील कार्यालय असा मूकमोर्चा काढला. यावेळी “भोंदू बाबा योगेश खैरनारला फाशी द्या”, “स्व. अक्षय सोनवणे आणि स्व. जयश्री काकुस्ते यांना न्याय मिळालाच पाहिजे” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

१६ मे रोजी घडलेल्या या धक्कादायक घटनेत अक्षय सोनवणे आणि जयश्री काकुस्ते या दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोर्चानंतर ग्रामस्थांच्या वतीने नायब तहसीलदार किरण कोठावदे, पोलिस निरीक्षक दीपक वळवी तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक मयुर भामरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात आरोपी योगेश खैरनार याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून तपास जलदगतीने पूर्ण करावा, तसेच हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच या गुन्ह्यातील सर्व दोषींना तातडीने अटक करून कोणालाही पाठीशी न घालता निष्पक्ष तपास करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. मूकमोर्चानंतर तहसील कार्यालय परिसरात निषेध सभा घेण्यात आली. मोर्चात नागरिकांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

या घटनेची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही देण्यात आल्याचे सांगण्यात आले. आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भूमिका यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---