---Advertisement---
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना थेट निवेदन; स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर संशय
शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे आणि सट्टा बाजार येत्या १० दिवसांच्या आत पूर्णपणे बंद करण्यात यावेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेच्या वतीने जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या अवैध धंद्यांमुळे शहरातील शांतता धोक्यात आली असून तरुण पिढी उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
’या’ भागात सुरू आहे उघडपणे सट्टा बाजार
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात मनसेने शहरातील काही प्रमुख आणि धक्कादायक ठिकाणांचा उल्लेख केला आहे, जिथे उघडपणे सट्टा बाजार सुरू आहे:
जिल्हा पेठ पोलीस हद्द: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटमध्ये चक्क शासकीय कार्यालयाच्या खालीच बिनधास्तपणे सट्टा सुरू आहे.
तालुका पोलीस हद्द: गुजरात पेट्रोल पंप उड्डाणपुलाशेजारी बळकावलेल्या जागेवर आणि कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धिविनायक चौकात थेट ‘ग्रीन शेड’ उभारून बेकायदेशीर सट्टा चालवला जात आहे.
रामानंद नगर पोलीस हद्द: रामानंद घाट नाल्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर सट्टा बाजार सुरू आहे.
स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
”अतिशय गंभीर बाब म्हणजे हे सर्व अवैध धंदे शासकीय कार्यालयांच्या आणि पोलिसांच्या नाकाखाली सुरू आहेत. संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यावर कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत आहे. पोलिसांच्या या सुस्त कारभारामुळेच गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे,” असा थेट आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
१० दिवसांचा ‘अल्टिमेटम’
मनसेने प्रशासनाला गांभीर्याने इशारा दिला आहे की, पुढील १० दिवसांत जर हे अवैध धंदे समूळ नष्ट झाले नाहीत, तर मनसे जळगाव शहरात त्रस्त नागरिकांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल.
हे निवेदन देतेवेळी मनसे उप महानगर अध्यक्ष राजेंद्र एस. निकम, श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, अनिता कापुरे, लक्ष्मी मोरे, विकास पाथरे, राजेश मराठे, इसुभ खाटीक, अजमल खाटीक, अली खाटीक, बादशहा खाटीक यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.









