---Advertisement---
जळगावात पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का देणारी एक गंभीर घटना उघड झाली आहे. अवैध वाळू तस्करांशी मिलीभगत करून दरमहा ‘हप्ता’ मागणाऱ्या तालुका पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण इंगळे याला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली.
अवैध वाळू उपशासाठी महिन्याला हप्ता मागतानाचे रामकृष्ण इंगळे याचे वाळू चोरासोबत झालेल्या चर्चेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात वाळू चोर निमखेडी लगत असलेल्या चंदु अण्णा नगरात २ ट्रॅक्टर चालतात. त्यासाठी अगोदरच्याला ५ हजार रुपये देत असल्याचं सांगतो, यावर हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण इंगळे कडून आता ४ हजार देण्याचं सांगितलं जातं. एवढेच नाही तर बिनधास्त काम सुरू ठेवण्याचाहि सल्ला दिल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून आले होते.
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तात्काळ कारवाई करत रामकृष्ण इंगळे याला निलंबित केले.
दरम्यान, हा व्हिडिओ बाहेर येण्यामागे पोलिस विभागातील अंतर्गत मतभेद आणि पैशांच्या व्यवहारातील स्पर्धा कारणीभूत असल्याची चर्चा सुरू आहे. गटबाजी आणि ‘कलेक्शन’च्या वादातूनच एकमेकांचे प्रकार उघड होत असल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे जळगाव पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.









