जळगाव जिल्ह्यात थंडी ओसरली; तापमानात वाढ होत असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली !

---Advertisement---

 

जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा थंडीचा कडाका आता हळूहळू ओसरू लागला असून, तापमानात वाढ होत असल्याने दिवसा उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. हिवाळा संपत असतानाच उन्हाळ्याची चाहूल लागल्याने जळगावकरांना सध्या दुहेरी हवामानाचा अनुभव येत आहे.
रविवारी जळगावचे किमान तापमान 13.2 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले, तर कमाल तापमान 32.5 अंशांवर पोहोचले. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात दिवसाचा पारा 32 अंशांच्या पुढे गेल्याने दुपारच्या वेळी उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत आहे.

दिवसा कडक ऊन आणि रात्री काहीशी थंडी असे विरोधाभासी वातावरण सध्या जाणवत आहे. वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे सकाळी आणि रात्री गारवा टिकून आहे, मात्र सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढल्याने दुपारी उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 9 फेब्रुवारीपासून पुढील काही दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहणार असून पावसाची कोणतीही शक्यता नाही. येत्या काळात कमाल तापमान 33 ते 35 अंशांपर्यंत वाढू शकते. विशेष म्हणजे, महाशिवरात्रीच्या सुमारास जळगावचा पारा थेट 38 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, पुढील सहा दिवस रात्रीचे किमान तापमान 14 ते 16 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळी व रात्री थंडीचा प्रभाव कायम राहील, तर दुपारी उन्हाचा चटका अधिक तीव्र होणार आहे.

हवामानातील या बदलामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---