---Advertisement---
जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरात बुधवारी रात्री हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली. भरधाव वेगाने धावणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील अनेक नागरिकांना धडक बसली. या अपघातात दोन दाम्पत्यांसह एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून एकूण पाच जण जखमी झाले आहेत.
अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलगा कार चालवत होता. भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने रस्त्यावरील तब्बल 9 जणांना धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी होती की परिसरात काही काळ एकच गोंधळ उडाला.
अपघातात दोन दाम्पत्यांसह एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच एका इलेक्ट्रिक दुचाकीस्वारालाही कारची जोरदार धडक बसल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. संतप्त नागरिकांच्या रोषाची भीती वाटल्याने अल्पवयीन चालक कार घटनास्थळीच सोडून फरार झाला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल झालेला नव्हता. मात्र पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून फरार अल्पवयीन चालकाचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे शहरातील अल्पवयीनांकडून वाहन चालवण्याच्या वाढत्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.









