---Advertisement---
जळगाव शहर व परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसंदर्भात दिल्या जाणाऱ्या नोटिसा इंग्रजीऐवजी मराठीत द्याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी NHAI प्रशासनाला निवेदन देत स्थानिकांच्या भावना मांडल्या.
महामार्गाच्या कामांदरम्यान अतिक्रमण हटविणे किंवा इतर प्रशासकीय कारवाईसाठी NHAI कडून नागरिकांना नोटिसा बजावल्या जातात. मात्र, या नोटिसा बहुतांश वेळा इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्यातील तांत्रिक बाबी समजणे कठीण जाते. विशेषतः अल्पशिक्षित व्यापारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होते.
या पार्श्वभूमीवर आशुतोष किशोरसाहेब जाधव यांच्या पुढाकाराने प्रकल्प संचालकांना निवेदन देण्यात आले. “महाराष्ट्राची राजभाषा मराठी असताना स्थानिक प्रशासनाने मराठीतच संवाद साधणे अपेक्षित आहे. नोटिसा मराठीत दिल्यास नागरिकांना कायदेशीर बाबी स्पष्ट होतील आणि अनावश्यक वाद टाळता येतील,” असे निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र निकम, ललित शर्मा, खुशाल ठाकूर, पंकज चौधरी, राजेश मराठे, दीपक राठोड, राहुल चव्हाण यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, प्रशासनाने या मागणीची दखल घेत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.









