---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी व वीजपुरवठा अखंडित ठेवण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून त्यांनी जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत संबंधित यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले.
“पाणी व वीज या अत्यावश्यक सेवा असून कोणत्याही परिस्थितीत त्यात खंड पडू नये,” असे सांगत त्यांनी महावितरणला विशेष दक्षता घेण्यास सांगितले. अत्यावश्यक परिस्थितीत वीज किंवा पाणीपुरवठा खंडित करावा लागल्यास जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्ह्यातील पाणीटंचाईबाबत दिलासादायक माहिती समोर आली. एप्रिलपर्यंत एकाही ठिकाणी टँकर सुरू करण्याची वेळ आलेली नसून केवळ १४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बैठकीत जलजीवन मिशनअंतर्गत येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच महावितरणकडील वीज जोडणीअभावी रखडलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करण्यास सांगण्यात आले. अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास संबंधित मोटार कनेक्शन तात्काळ बंद करण्याचे आदेशही देण्यात आले.
दरम्यान, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भुसावळ औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठ्याच्या अडचणींकडे लक्ष वेधत हा प्रश्न तात्काळ सोडवण्याच्या सूचना केल्या. तसेच अमृत योजनेअंतर्गत प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी माहिती देताना सांगितले की, गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असून सध्या प्रमुख प्रकल्पांमध्ये सुमारे ४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २६ योजनांपैकी १३ पूर्ण झाल्या असून उर्वरित अंतिम टप्प्यात आहेत. या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषदांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









