भुसावळ हादरलं! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या १० वर्षीय बालकाचा मृत्यू; १५ दिवस मृत्यूशी झुंज अयशस्वी….!

---Advertisement---

 

भुसावळ शहरातील नारायण नगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या १० वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

तारकेश डोणे असे मृत बालकाचे नाव असून २४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास तो शाळेत जात असताना भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला होता. या भीषण हल्ल्यात त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. विशेषतः नाकाला मोठी दुखापत झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

प्राथमिक उपचारानंतर तारकेशवर जळगाव येथे उपचार सुरू होते. काही दिवसांनंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला घरी आणण्यात आले होते. मात्र अचानक त्याची प्रकृती पुन्हा खालावल्याने कुटुंबीयांनी त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलवले.

गेल्या अनेक दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या या चिमुकल्याची अखेर उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

भुसावळ शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे स्थानिक प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---