जळगाव सुवर्णनगरीत ग्राहकांना मोठा धक्का…सोन्याच्या दरात तब्ब्ल ८ हजारांची तर चांदीत १५ हजारांची वाढ; आयात शुल्कात वाढ होताच परिणाम…!

---Advertisement---

 

केंद्र सरकारकडून आयात शुल्कात करण्यात आलेल्या मोठ्या वाढीचा थेट परिणाम आता सराफा बाजारावर दिसून येत आहे. आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे. अचानक वाढलेल्या भावामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील सराफा व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात तब्बल ८ हजार रुपयांची वाढ झाली असून चांदीच्या भावातही १५ हजार रुपयांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. आज जळगाव बाजारात सोन्याचा दर १ लाख ५९ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला असून जीएसटीसह हा दर १ लाख ६३ हजार ७७० रुपयांपर्यंत गेला आहे. तर दुसरीकडे चांदीचे दरही विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. चांदीचा दर २ लाख ८५ हजार रुपये झाला असून जीएसटीसह ग्राहकांना तब्बल २ लाख ९३ हजार ५५० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे लग्नसराईच्या हंगामात खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार असल्याचे चित्र आहे.

जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झालेली नसतानाही भारतात दर वाढण्यामागे आयात शुल्क वाढ हेच प्रमुख कारण असल्याचे सराफा व्यावसायिकांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने आयात शुल्कात तब्बल ९ टक्क्यांची वाढ केल्याने त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला आहे.

सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आयात शुल्क वाढल्यानंतर आगामी काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात आणखी १४ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघेही सध्या संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---