चाळीसगावात एटीएम कार्ड बदलून 40 हजारांची फसवणूक; बिहारच्या आरोपीला कोपरगावातून अटक…!

---Advertisement---

 

चाळीसगाव शहरात एटीएममध्ये हातचलाखी करून कार्ड बदलत 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी बिहारमधील आरोपीला कोपरगाव तालुक्यातून अटक केली आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलिसांनी प्रभावी पावले उचलल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजेच्या सुमारास विकास भावलाल राठोड (वय 40, रा. चैतन्य तांडा, करगाव, ता. चाळीसगाव) हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भडगाव रोडवरील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने मदत करण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत त्यांचे एटीएम कार्ड बदलले.

यानंतर संबंधित आरोपीने राठोड यांच्या खात्यातून 40 हजार रुपये काढून घेतले. फसवणूक लक्षात आल्यानंतर राठोड यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा क्रमांक 145/2026 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 118(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सोनुकुमार पंचानंद सनगही (वय 32, रा. भमरपूर, बिहार) हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी कोपरगाव तालुक्यातील पडेगाव येथे असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

अटक केलेल्या आरोपीला चाळीसगाव येथे आणून पुढील कारवाई करण्यात आली असून, त्याच्याकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---