---Advertisement---
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. सत्तेच्या राजकारणापलीकडे जाऊन हा धक्का भावनिक पातळीवर प्रत्येकाला हादरवणारा ठरला आहे. अशाच भावनांनी भरलेला एक क्षण आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पाहायला मिळाला. आज पार्थ पवार प्रथमच त्या केबिनमध्ये गेले, जिथे अजित पवारांनी अनेक महत्त्वाचे राजकीय आणि प्रशासकीय निर्णय घेतले होते. केबिनमध्ये प्रवेश करताच पार्थ पवार क्षणभर थबकले. समोर असलेला दादांचा फोटो पाहून त्यांचे डोळे भरून आले.
क्षणातच त्यांची नजर त्या खुर्चीकडे गेली…ज्यावर बसून अजित पवारांनी आयुष्यभर राज्यासाठी काम केलं. पार्थ पवार त्या खुर्चीजवळ गेले, आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी ती खुर्ची घट्ट मिठीत घेतली. तो क्षण पाहणाऱ्यांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. पार्थ पवारांना अश्रू अनावर झाले, हुंदके आवरणं त्यांना शक्य झालं नाही. दादांची उणीव शब्दांत मांडण्यापलीकडे होती.
यानंतर पार्थ पवारांनी अजित पवारांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेतले. आजपासून हा अस्थी कलश राज्यभर नेण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
यावेळी पक्ष कार्यालयात शोकाकूल वातावरण होते. उपस्थित नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतही पाणी होतं. हा केवळ एका नेत्याचा निरोप नव्हता, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक युग संपल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती.









