---Advertisement---
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातापूर्वीचा शेवटचा फोन कॉल समोर आला असून, हा कॉल त्यांनी पुतणे श्रीजित पवार यांच्याशी केला होता. ही ऑडिओ क्लिप बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना ऐकवण्यात आली. हा संवाद ऐकून उपस्थित कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. सध्या ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या संभाषणातून अजित पवार शेवटपर्यंत सर्व जाती-धर्मातील समाजघटकांना एकत्र घेऊन चालण्याच्या भूमिकेवर ठाम होते, हे स्पष्ट होत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व देण्याची त्यांची राजकीय दूरदृष्टी आणि बांधिलकी अखेरपर्यंत कायम राहिल्याचे या कॉलमधून दिसून येते.
शेवटच्या कॉलमध्ये काय म्हणाले अजित पवार?
ऑडिओ क्लिप थेट शेअर करण्यात आलेली नसली, तरी त्यातील संवादाची माहिती समोर आली आहे. अजित पवार पुतणे श्रीजित पवार यांना म्हणताना ऐकू येतात,
“अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे हे माळी समाजाचे नेतृत्व आहेत. अनेक वर्षांनंतर संपूर्ण जिल्हा बँकेचे चेअरमन मी स्वतः त्यांना केले आहे. अनेकदा वस्तुस्थिती माहिती नसताना काही गोष्टी बोलल्या जातात. आम्ही राजकारण करताना सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊनच चालतो.”
यावर श्रीजित पवार उत्तर देतात,
“नाही दादा, मला जे माहित होते तेच मी सांगितले.”
पुढे अजित पवार म्हणतात,
“तुझं म्हणणं मान्य आहे, पण वस्तुस्थिती समजून घे. आताही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुपे गटातून माळी समाजाला उमेदवारी दिली आहे. इतर कोणत्याही पक्षाने असा निर्णय घेतलेला नाही. आम्ही समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम करत आहोत.”
शेवटी श्रीजित पवार म्हणतात,
“ठीक आहे दादा, तुम्हाला जो निर्णय योग्य वाटतो तो अंतिम आहे. धन्यवाद.”
हा संवाद अजित पवार यांच्या सोबतच राजकारणाची आणि समाजन्यायाविषयीच्या भूमिकेची साक्ष देणारा असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.









