---Advertisement---
भारतातील मद्यप्रेमी आणि बार व्यवसायासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने जागतिक व्यापार क्षेत्रात घेतलेल्या दोन महत्त्वाच्या निर्णयांमुळे परदेशी ब्रँडेड दारूच्या किमतींमध्ये मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युरोपियन युनियन आणि अमेरिकेसोबत झालेल्या नव्या व्यापार करारांमुळे आयात मद्यावर आकारले जाणारे जादा शुल्क कमी होणार आहे.
आत्तापर्यंत विदेशी मद्यावर तब्बल 140 ते 166 टक्के आयात शुल्क आकारले जात होते. त्यामुळे स्कॉच, आयरिश व्हिस्की किंवा अमेरिकन बोर्बोन भारतात प्रचंड महाग मिळत होती. मात्र नव्या ट्रेड फ्रेमवर्कनुसार हे शुल्क 30 ते 40 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. याचा थेट फायदा ग्राहकांच्या खिशाला होणार आहे.
आजवर 4500 ते 6000 रुपयांना मिळणारी स्कॉच व्हिस्की लवकरच 2500 ते 3000 रुपयांच्या दरात उपलब्ध होऊ शकते. दुबई किंवा सिंगापूरमध्ये स्वस्त मिळणारी विदेशी दारू आता भारतातही परवडणाऱ्या किमतीत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आयात शुल्क कमी झाल्यानंतर भारतात जागतिक ‘ड्रिंकिंग कल्चर’ला चालना मिळेल, असा अंदाज आहे. स्कॉच आणि आयरिश व्हिस्की आपल्या परंपरेच्या जोरावर ग्राहकांना आकर्षित करतील, तर अमेरिकन बोर्बोन भारतीय बारमध्ये अधिक प्रमाणात दिसू लागेल. यामुळे स्कॉच आणि बोर्बोन यांच्यात थेट स्पर्धा पाहायला मिळेल.
ग्राहकांसाठी ही बातमी आनंदाची असली तरी भारतीय मद्यनिर्मिती उद्योगासाठी हे मोठे आव्हान ठरणार आहे. ‘इन्द्री’, ‘अमृत’ यांसारख्या भारतीय प्रीमियम ब्रँड्सना आता थेट जागतिक ब्रँड्सशी स्पर्धा करावी लागणार आहे. विदेशी ब्रँड्सच्या किंमती भारतीय मद्याच्या जवळ आल्यास ग्राहकांची पसंती कोणाला मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.









