---Advertisement---
मध्य प्रदेशातील मंदसौर शहरात घडलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. भाजपच्या एका नगरसेवकाच्या पत्नीची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मध्यप्रदेश राज्यातील मंदसौरमधील अभिनंदन कॉलनी परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी एका महिलेवर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत महिलेचे नाव रूबीना शाहिद मेव असून त्या भाजप नगरसेवक शाहिद मेव यांच्या पत्नी होत्या. ज्या वेळी घटना घडली त्या वेळेस रूबीना ह्या माहेरवरून सासरी जाण्यासाठी ऑटोने निघाल्या होत्या. घरापासून अवघ्या काही अंतरावर असतानाच दुचाकीवर आलेल्या दोन आरोपींनी ऑटो थांबवून त्यांना खाली पाडले आणि धारदार शस्त्राने वार करून पळ काढला.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
पोलिसांनी प्राथमिक तपास करत तपासात घटना कौटुंबिक वादातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मंदसौर शहरातले भाजप नगरसेवक शाहिद मेव यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा साहिल याच्यावर संशयाची सुई वळली आहे. साहिल सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. साहिल हा वडिलांच्या तिसऱ्या लग्नामुळे नाराज होता आणि याच कारणावरून घरात वारंवार वाद होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर पती शाहिद मेव यांनी कोणावरही थेट संशय व्यक्त करण्यास नकार दिला आहे.
शाहिद मेव हे मंदसौर नगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक १५ मधून भाजपचे नगरसेवक आहेत. विशेष म्हणजे, गेल्याच आठवड्यात त्यांच्यावर सट्टा खेळल्याचा आरोप झाला होता आणि त्या प्रकरणात त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यामुळे या हत्येप्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण घटनेमुळे मंदसौर शहरात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.









