---Advertisement---
महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवा आणि ऐतिहासिक अध्याय लिहिला गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा अजित पवार यांनी आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. त्यांच्या या ऐतिहासिक शपथविधीनंतर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, सुनेत्रा पवार यांनी यावेळी महाराष्ट्राला दिलेले वचन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक भावूक ट्विट करत महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. या ट्विटमध्ये त्यांनी अजित पवार यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त करत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना विश्वास, कर्तव्य आणि त्यागाची जाणीव आहे. अजितदादांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्यभर घेतलेला ध्यास हा माझ्यासाठी मार्गदर्शक ठरेल.”
पुढे त्या म्हणाल्या, “दादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; मात्र त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल.”
https://x.com/i/status/2021111268107747777
दरम्यान, मंत्रालयात पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी पक्षातील आणि सत्ताधारी आघाडीतील प्रमुख नेत्यांसोबत प्राथमिक बैठक घेतली. या बैठकीत आगामी राजकीय व प्रशासकीय रणनीतीवर चर्चा करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर त्या आज त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
राज्याच्या विकासकामांना गती देणे, प्रशासन अधिक लोकाभिमुख करणे आणि जनतेचे प्रश्न तातडीने मार्गी लावणे, हेच आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांसाठी हा क्षण प्रेरणादायी मानला जात असून, त्यांच्या भूमिकेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.









