---Advertisement---
यावल शहरात एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली असून शेतात काम करत असताना असंख्य मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे यावल शहरासह परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरातील देशमुख वाडा परिसरातील गणेश रविंद्र पाटील वय ३८ हे दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील निमगाव शिवारातील खुबसिंग नयनसिंग पाटील यांच्या मालकीच्या शेतात कामासाठी गेले होते. शेतातील काम सुरू असताना तेथील एका झाडावर असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यात अचानक हालचाल झाल्याने मधमाश्यांनी गणेश पाटील यांच्यावर एकाच वेळी हल्ला केला. मधमाश्यांच्या तीव्र चाव्यांमुळे गणेश पाटील गंभीर जखमी झाले व काही वेळातच ते बेशुद्ध पडले. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
गणेश पाटील हे रविंद्र पाटील यांच्या कुटुंबातील एकुलते एक पुत्र होते. त्यांच्या अशा अकाली आणि दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून देशमुख वाडा परिसरासह संपूर्ण यावल शहरात शोककळा पसरली आहे. नागरिकांकडून कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
या प्रकरणी राहुल रमेश झाबरे वय ३३ यांनी दिलेल्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. घटनेची नोंद अधिकृतरीत्या करण्यात आली आहे.









