---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. वाळूने भरलेला डंपर पकडल्यानंतर त्यावर कायदेशीर कारवाई न करता सोडून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील ३० हजार रुपये स्वीकारताना महसूल विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे.
या कारवाईत ममुराबादचे तलाठी सदानंद व्यंकटी मुंडे (वय ३४) आणि म्हसावदचे मंडळ अधिकारी अभिजित नामदेव येवले (वय ३९) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वाळू व्यवसायिक आहेत. ४ फेब्रुवारी रोजी तलाठी सदानंद मुंडे यांनी वाळूने भरलेला डंपर ताब्यात घेतला होता. मात्र, मंडळ अधिकारी अभिजित येवले यांच्या फोनवरील सूचनेनंतर कोणतीही कारवाई न करता तो डंपर सोडून देण्यात आला. ही कारवाई टाळण्यासाठी दोघांनी मिळून ५० हजार रुपयांची लाच मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने ११ फेब्रुवारी रोजी एसीबीकडे अधिकृत तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे जळगाव शहरात ३० हजार रुपये स्वीकारताना तलाठी सदानंद मुंडे याला रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर मंडळ अधिकारी अभिजित येवले यालाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले. या कारवाईमुळे महसूल विभागातील लाचखोरीचा प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एसीबीची ही धडक कारवाई लाचखोर अधिकाऱ्यांसाठी मोठा इशारा मानली जात आहे.









