भुसावळ : हिवाळा संपण्याआधीच उन्हाचा तडाखा वाढला; तापमान 35 अंशांच्या घरात

---Advertisement---

 

भुसावळ शहर व परिसरात यंदा हिवाळा निरोप घेण्यापूर्वीच उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच कमाल तापमानाचा पारा 34 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान स्थिरावत असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे नागरिकांसाठी कठीण होत आहे. गेल्या वर्षी याच काळात तापमान सरासरी 33 अंशांपर्यंत मर्यादित होते.
दरम्यान, जळगाव शहरातील गत सहा दिवसांच्या तापमान नोंदी पाहता कमाल तापमान सातत्याने 34 अंशांच्या पुढे राहिल्याचे दिसून आले आहे. तापमानात झालेल्या या वाढीमुळे दुपारच्या वेळी उष्णतेचा त्रास अधिक जाणवत असून नागरिक घामाघूम होत आहेत. आर्द्रता कमी झाल्यामुळे हवेत कोरडेपणा वाढून उष्णतेची तीव्रता अधिक वाढली आहे.
सामान्यतः मार्च महिन्याच्या उत्तरार्धात जाणवणारी उष्णता यंदा फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात पासून जाणवू लागली आहे. सकाळ व रात्री हलकी थंडी असली तरी दुपारी सूर्याची तीव्रता वाढलेली दिसत आहे.
हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीपासून थंडी कमी होऊन तापमानात वाढ होत आहे. सूर्यकिरणांची तीव्रता वाढत असून सूर्य हळूहळू उत्तरेकडे सरकत असल्याने किरणे थेट जमिनीवर पडत आहेत. त्यामुळे दिवसाचा कालावधीही वाढत आहे. उत्तरेकडील थंड वारे मंदावले असून दक्षिणेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होत आहे.
येत्या आठवड्यात पावसाची किंवा ढगाळ वातावरणाची कोणतीही शक्यता नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे तसेच सुती कपड्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---